अमृतसर : पंजाब (Punjab) विधानसभेत काँग्रेसला धूळ चारत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) ९२ जागा जिंकत एकहाती आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhawant Mann) पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. मान यांची आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर शनिवारी त्यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी हा दावा स्विकारला असून १६ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता खटकर कलान या भगतसिंग यांच्या मूळ गावी त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी खटकर कलानमधील तब्बल १५० एकरांवरील गव्हाचे भुईसपाट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘द ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार पंजाबचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांनी सोमवारी शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. मान यांनी या सोहळ्यासाठी राज्यातील सर्वांना निमंत्रण दिल्यामुळे तब्बल २ लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यासाठीच्या मंडपाचा आकार १३ एकरांवरुन तब्बल १५० एकरांवर नेण्यात आला आहे. या १५० एकरांवरील जवळपास २० शेतकऱ्यांना ४५ हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे या नुकसानाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी मान यांनी खास शैलीत पंजाबवासियांना निमंत्रण दिले आहे. काल एक व्हिडिओ ट्विट करुन मान म्हणाले, “तुमच्या भावाला प्रोत्साहन देण्यासाठी १६ तारखेला कृपया सकाळी १० वाजता खटकर कलान येथे या, येताना महिलांनी भगवे दुपट्टे आणि पुरुषांनी भगवी पगडी घालून याव, कारण शीख धर्मात केशरी रंगाला महत्त्व आहे. आपण त्या दिवशी खटकर कलान गावाला भगव्या रंगाने रंगवून टाकू, मी आपली आतुरतेने वाट बघत आहे.

